सावरकर स्मारकाच्या पुढाकाराने धसईतील स्वयंचलित बँकेचे अण्णा हजारेंकडून उद्घाटन सावरकरांचा आधुनिकतावाद आणि गांधींची अध्यात्मिकता देशाच्या विकासासाठी अत्यंत प्रेरणादायी ः अण्णा हजारे ---- स्वातंत्र्यवीर सावरकरांचा त्याग विसरता कामा नये ः अण्णा हजारे -------
स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा आधुनिकतावाद आणि विज्ञानवाद तर महात्मा गांधी यांची आध्यात्मिक वृत्ती यांचा अंगीकार केला तर निश्चितपणे आपण राष्ट्राच्या विकासात मोठे योगदान देऊ शकू, त्याचप्रमाणे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासारख्या महापुरूषांनी देशाच्या कल्याणार्थ स्वतःला दाण्याप्रमाणे गाडून घेतले, त्याग केला, त्यानंतरच आपल्याला कणीसरुपी दाण्याचे रुप प्राप्त झाले, हे विसरता कामा नये, त्यांच्या विचारांनुसारच धसई गावातील नागरिकांनी कृतीची जोड देत स्वयंचलित बँक सुरू करण्यासाठी कार्य दिले, इथला माणूस आता बदलतोय, आधुनिकतेकडे वळतोय, हे कॅशलैसच्या व्यवहारातून दिसून येते. गाव बदलण्यासाठी गावातली माणसं बदलली पाहिजेत, प्रत्येकाने स्वयंनेतृत्वाने बदल घडवला पाहिजे, असे विचार ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केले.
आदिवासी विभागातील स्वयंचलित बँकेच्या बाबतीत धसई गाव हे देशातील पहिलेच उदाहरण आहे. बँका या देशाच्या, समाजाच्या, आर्थिक विकासाच्या नाड्या आहेत. या रक्तवाहिन्या सुरळीत ठेवण्याकडे लक्ष दिले पाहिजे. बँकाच्या या देशाच्या, समाजाच्या व आर्थिक विकासाच्या नाड्या आहेत, या नाड्या रक्तवाहिन्यांप्रमाणे शाबूत ठेवल्या पाहिजेत, असेही ते म्हणाले.
स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने बँक ऑफ बडोदाच्या सहकार्याने धसई (मुरबाड) येथे आदिवासी विभागातील देशातील पहिली स्वयंचलित बँक सुरू होत असून त्याचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी बँक ऑफ बडोदाचे महाप्रबंधक नवतेज सिंग, स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर, ज्येष्ठ पत्रकार व माजी खासदार भारतकुमार राऊत, स्मारकाच्या कोषाध्यक्ष मंजिरी मराठे, धसई गावातील कैलास घोलप, स्वप्नील पाटकर, दिलीप सुरवसे, अशोक घोलप आदी मान्यवर उपस्थित होते.
या विषयी बोलताना स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर म्हणाले की, कैशलेस व्यवहार वाढल्याने बँकेद्वारा ग्रामीण भागात शेती, उद्योग, शिक्षण या साठी मोठ्या प्रमाणात अर्थपुरवठा होईल आणि ग्रामीण भाग आर्थिक दृष्टया स्वयंपूर्ण होईल. स्वा. सावरकर आणि महात्मा गांधी यांचे मार्ग वेगळे असले तरी अंतिम ध्येय एकच होते. त्यामुळेच ग्रामस्वराज्याची महात्मा गांधींची कल्पना आणि स्वा. सावरकरांचा अत्याधुनिक तंत्राचा आग्रह यांच्या संयोगातूनन धसईचे भविष्य उज्ज्वल होणार आहे.
सुमारे सहा महिन्यापूर्वी ही संकल्पना सांगण्यात आली. त्यावेळी स्वयंचलित बँकेचे व्यवहार आदिवासी भागात अशक्यप्राय वाटत होते, पण या भागातील माणसं जिद्दीने झपाटलेली आहे, त्यामुळे अनेकांना अवघड वाटणारी ही संकल्पना आज साकार होताना दिसत आहे. विशेष बाब म्हणजे धसई हा दुर्गम आणि आदिवासी ग्रामीण भाग असून त्यांनी आणि रणजित सावरकर यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे आज हे गाव देशाच्या नकाशावर उमटले आहे, ही खरोखरच अभिमानाची आणि कौतुकाची बाब आहे. त्यामुळे अशाप्रकारच्या उपक्रमांचा आदर्श इतर गावांनीदेखील घेतला पाहिजे, असे विचार ज्येष्ठ पत्रकार व माजी खासदार भारतकुमार राऊत यांनी व्यक्त केले.
नोटबंदीच्या काळात ज्या पद्धतीने सर्वांनीच नाराजी व्यक्त केली, पण या संकल्पनेचे स्वागत धसईकरांनी सर्वप्रथम केले. त्यांना रणजित सावरकर यांनी दिलेली साथ आणि पुढाकार पाहून आमच्या व्यवस्थापनाने सहकार्याची भूमिका केली. बँक ऑफ बडोदाने नेहमीच विधायक व सकारात्मक कार्याला पाठिंबा दिला आहे. ग्रामीण व आदिवासी विभागात आर्थिक विकासाच्या योजना अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी आम्ही जाणीवपूर्वक धसई गाव निवडले व इथल्या मंडळींच्या सहकार्यातून आजचे हे स्वप्न साकार होत आहे, त्यामुळे यापुढील काळातदेखील आवश्यक त्या पातळ्यांवर व्यवस्थापन कार्य करेल, असा विश्वास बँकेचे महाप्रबंधक नवतेज सिंग यांनी व्यक्त केला.
स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांच्या पुढाकाराने ठाणे जिल्ह्याच्या आदिवासी क्षेत्रातले धसई नोटबंदी नंतर भारतातील पहिले रोखमुक्त गाव ठरले आहे. धसई गावाची लोकसंख्या सुमारे आठ हजार असली तरी आजूबाजूच्या सत्तावीस गट-ग्रामपंचायतीतील सुमारे ६०००० लोक या बाजारपेठेवर अवलंबून आहेत. स्मारक या भागात रोखमुक्त व्यवहार वाढावेत यासाठी नियमित प्रशिक्षण कार्यक्रम राबवीत आहे. आतापर्यंत सुमारे ८०० विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष डेबिट कार्ड वापरून व्यवहार करण्याची संधी देण्यात आली. मोबाईल क्रांतीमुळे आज अगदी दुर्गम भागातील अशिक्षित लोकांना पासवर्ड वापरण्याची सवय झाली आहे. त्यामुळे स्वयंचलित बँका दुर्गम भागातील लोकांना उत्तम सेवा देऊ शकतील. म्हणूनच धसई येथे सुरु होणारी स्वयंचलित बँक ही ग्रामीण बँकिंग क्षेत्रातील एक क्रांतिकारी पाऊल आहे.